Ad will apear here
Next
प्रफुल्ला डहाणूकर, केवलानंद सरस्वती उदयशंकर, वसंतदादा पाटील
आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या चित्रकार प्रफुल्ला डहाणूकर, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे गुरू, वाई येथील प्राज्ञपाठशाळेचे संस्थापक केवलानंद सरस्वती उदयशंकर आणि महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील नेते वसंतदादा पाटील यांचा एक मार्च हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
........
प्रफुल्ला डहाणूकर
एक जानेवारी १९३४ रोजी बांदोडा-गोवा येथे प्रफुल्ला दिलीप डहाणूकर यांचा जन्म झाला. माहेरच्या त्या प्रफुल्ला सुब्राय जोशी. त्या एक मराठी चित्रकार होत्या. बॉम्बे आर्ट सोसायटी, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, आर्टिस्ट्सद सेंटर, जहांगीर आर्ट गॅलरी, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, गोवा कला अकादमी आदी अनेक कलासंस्थांच्या त्या अध्वर्यू होत्या.

प्रफुल्ला डहाणूकर यांचे वडील सुब्राय अनंत जोशी यांचा वाहतुकीचा व वाहनांचा व्यवसाय होता. प्रफुल्ला डहाणूकर पाच वर्षांची असतानाच त्यांचे कुटुंब मुंबईत आले. प्रफुल्लाचे शालेय शिक्षण मुंबईतच झाले. शाळेच्या मासिकासाठी तिने काढलेली चित्रे बघून वडिलांनी तिला कलाशिक्षणासाठी ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’मध्ये दाखल केले. १९५५ मध्ये ‘जेजे’मधून सुवर्णपदक मिळवून कलापदवीधर झाल्यानंतर प्रफुल्ला डहाणूकर चित्रकलेच्या अधिक शिक्षणासाठी फ्रान्स सरकारची शिष्यवृत्ती मिळवून १९६१मध्ये पॅरिसला गेल्या आणि शिक्षण पूर्ण करून परत भारतात आल्या. 

त्या भित्तिचित्रांमध्ये प्रवीण होत्या. भारतामध्ये अशा चित्रांसाठी त्यांनीच पहिल्यांदा रोलरचा वापर सुरू केला. पदवी घेऊन बाहेर पडल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनात रौप्य पदक (सिल्व्हर मेडल) मिळवत त्यांनी आपल्या चित्रकलेतल्या कौशल्याची चुणूक दाखवून दिली होती. वर्षभरातच त्यांनी स्वतःची चित्र प्रदर्शने भरवून कलाप्रेमींची मने जिंकली. चित्रकलेच्या क्षेत्रातील त्यांची कारकिर्द वाखाणण्याजोगी ठरली. 

चित्रकलेतल्या सुवर्णमहोत्सवी कारकिर्दीचा गौरव म्हणून जहांगीर आर्ट गॅलरीने त्यांना निवडक चित्रांचे विशेष प्रदर्शन भरवण्याचा बहुमान दिला होता. फ्रान्सने दिलेल्या शिष्यवृत्तीद्वारे कला शाखेचा अभ्यास करत असताना त्यांनी फ्रान्स, इंग्लंड, हंगेरी, स्वित्झर्लंड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, जपान, पोर्तुगाल, आइसलंड या ठिकाणी भरवलेली प्रदर्शने प्रचंड गाजली होती. भारतीय दूतावासाने तब्बल तीन वेळा लंडनमध्ये डहाणूकर यांच्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित केले होते. ही तिन्ही प्रदर्शने कलाविश्वात कौतुकास पात्र ठरली होती. 

सिटी बँक आणि बार्कले बँकेनेही डहाणूकर यांची विदेशात प्रदर्शने आयोजित केली होती. त्यांच्या दुबईतल्या एका प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध चित्रकार एम. एफ. हुसेन यांच्या हस्ते झाले होते. प्रफुल्ला डहाणूकर यांचे निधन एक मार्च २०१४रोजी झाले.
...........
केवलानंद सरस्वती उदयशंकर
आठ डिसेंबर १८७७ रायगड जिल्ह्यातील सुडकोली गावी नारायण सदाशिव मराठे उर्फ केवलानंद सरस्वती उदयशंकर यांचा जन्म झाला. ते महाराष्ट्रातील धर्मसुधारणावादी श्रेष्ठ संस्कृत पंडित होते. ऋग्वेद, संस्कृत काव्यवाङ्मय आणि व्याकरण, न्याय, वेदान्त, मीमांसा इत्यादींत पारंगत होते. शिक्षण प्राचीन पद्धतीने गुरुगृही झाले. नव्य-न्यायाचे व शांकर अद्वैत वेदान्ताचे अध्ययन १८९५ मध्ये वाई येथे आल्यावर झाले. अध्यात्मविद्येचे अध्ययन प्रज्ञानंदसरस्वती यांच्यापाशी झाले. वाई येथे त्यांनी स्वतःची पाठशाळा १९०१पासून सुरू केली. त्याच पाठशाळेचे ‘प्राज्ञपाठशाळा’ असे नामकरण १९१६ साली केले. दिनकरशास्त्री कानडे, महादेवशास्त्री दिवेकर, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आदी त्यांचे नामवंत शिष्य होते.

१९२० साली प्राज्ञपाठशाळेस राष्ट्रीय शिक्षणसंस्थेचे स्वरूप दिले. त्यातून अनेक स्वातंत्र्य सैनिक तयार झाले. यशवंतराव चव्हाण यांचाही त्यांच्याशी संपर्क होता. कृष्णा घाटावर त्यांचे वास्तव्य होते.

१९२५ साली धर्मकोशाच्या कार्यास त्यांनी प्रारंभ केला. संस्कृतमध्ये मीमांसाकोश (सात खंड, १९५२ - ६६) संपादन केला. हिंदुधर्मसुधारणेची चळवळ चालू ठेवण्याकरिता १९३४ साली म. म. डॉ. पां. वा. काणे, रघुनाथशास्त्री कोकजे, केशव लक्ष्मण दप्तरी, ना. गो. चापेकर, ज. र. घारपुरे, म. म. श्रीधरशास्त्री पाठक इत्यादी विद्वानांच्या साहाय्याने, धर्मनिर्णयमंडळ स्थापिले. ब्रह्मचर्यातूनच १९३१ साली त्यांनी संन्यास घेतला. संन्यास घेतल्यावर बद्रीनाथची पायी यात्रा केली. करारी स्वभाव, उज्ज्वल चारित्र्य, अध्यात्मनिष्ठा व त्यागी जीवन हे त्यांचे व्यक्तिमत्त्वविशेष होत. वाई येथे ते निधन पावले. त्यांचे तेथे स्मारकमंदिर उभारले असून, तेथे धर्मकोशाचे संपादनकार्य चालते. १९७५पर्यंत त्याचे अकरा भाग प्रकाशित झाले. मीमांसाकोश व धर्मकोश ह्या ग्रंथांना आंतरराष्ट्रीय कीर्ती लाभली. केवलानंद सरस्वती उदयशंकर यांचे एक मार्च १९५५ रोजी निधन झाले.
.........
वसंतदादा पाटील
१३ नोव्हेंबर १९१७ रोजी पद्माळे, सांगली येथे वसंतदादा पाटील यांचा जन्म झाला. वसंतदादांचे शिक्षण जेमतेम सातवीपर्यंत झाले होते; पण महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला एक वेगळे, निर्णायक वळण देऊन विकास साधणारे नेते, क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक ते विधायक कार्य करणारे, पक्ष संघटना वाढवणारे राजकीय नेते, प्रभावी मुख्यमंत्री व सहकार महर्षी असा त्यांचा जीवन प्रवास आपल्याला थक्क करतो. 

वसंतदादा १९७७ ते १९८५ या काळात चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. एकूण सुमारे चार वर्षे त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळले. ते काही काळ राजस्थानचे राज्यपालही होते. त्या आधी १९७२मध्ये ते प्रथम मंत्री झाले होते. तसेच स्वतंत्र भारतातल्या पहिल्या निवडणुकीतच ते सांगलीतून आमदार म्हणून निवडून आले होते. पुढील काळात सुमारे २५ वर्षे त्यांनी सांगलीचे प्रतिनिधित्व विधानसभेत व लोकसभेत केले. वसंतदादा स्वत: फारसे शिकलेले नव्हते; पण १९८३ साली मुख्यमंत्री या नात्याने त्यांनी विनाअनुदान तत्त्वावर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी देऊन महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात एक वेगळ्या पद्धतीची आमूलाग्र क्रांती घडवून आणली. 

महाराष्ट्रातील मुलांना अन्य कोणत्याही राज्यात जाऊन उच्च शिक्षणासाठी हात पसरावे लागू नयेत यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला होता. 

सहकार क्षेत्रात दादांचा प्रत्येक शब्द अंतिम मानला जात असे. भारतातील सर्वांत मोठा सहकारी साखर कारखाना त्यांनी सांगली जिल्ह्यात माधवनगर परिसरात उभारला. या कारखान्याच्या उभारणीसाठी या नेत्याने अक्षरश: मैलोन्मैल भटकंती केली. शेताच्या वावरातील बांधावर उभे राहून उसाच्या लागवडीपासून कापणीपर्यंत शेतकऱ्यांना सातत्याने मार्गदर्शन केले. केवळ साखर कारखाने उभारून थांबू नका तर त्या जोडीने पूरक उद्योगांचीही स्थापना करा हा दादांचा आग्रह असे. त्यामुळे साखर कारखान्यांच्या आजूबाजूलाच सहकारी बँका, पतसंस्था, छोटे-मोठे दूधसंघ यांची उभारणी झाल्याचे अनेक ठिकाणी हमखास पाहायला मिळायचे. त्यातून शेतकऱ्यांना कर्जपुरवठा व्हायचा. या कर्जातून जर्सी गायी- म्हशी शेतकऱ्यांच्या दारात झुलताना दिसू लागल्या. त्यातून झालेली दूधनिर्मिती सहकारी दूध संघाकडून खरेदी केली जायची. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात रोख पैसा खेळू लागला आणि ग्रामीण महाराष्ट्रात स्वत:ची अशी एक स्वतंत्र अर्थव्यवस्थाच निर्माण झाली.

दादांनी स्थापन केलेल्या शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडून प्रोत्साहन घेऊन मग महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या नेत्यांनी सहकारी साखर कारखान्यांची स्थापना केली. राजकीय जीवनात त्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, राष्ट्रीय मिल मजदूर संघ, व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आदी संस्था-संघटनांची अध्यक्षपदे सांभाळली. पक्ष कार्याला त्यांनी विशेष महत्त्व दिले. वसंतदादांनंतर काँग्रेस पक्ष संघटनेला एवढे बळ देणारा नेता पुढे काँग्रेसला महाराष्ट्रात मिळालाच नाही. प्रामुख्याने ग्रामीण महाराष्ट्रात काँग्रेसचा प्रभाव कायम राहण्यात व वाढण्यात दादांचाच वाटा मोठा होता असे राजकीय निरीक्षक म्हणतात. सत्तेची हाव नसलेला सत्ताधारी, असे वसंतदादांबद्दल म्हटले जाते. वसंतदादा पाटील यांचे एक मार्च १९८९ रोजी निधन झाले.

माहिती संकलन : संजीव वेलणकर
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZZKCK
Similar Posts
महाराष्ट्राचे ‘दादा’! मराठी भाषा व संस्कृतीत ‘दादा’ म्हणजे मोठा भाऊ. उभ्या महाराष्ट्राला थोरल्या भावाचे प्रेम व हक्काचा आधार देणारे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची आज (एक मार्च) पुण्यतिथी! त्यांच्या स्मृतींना प्रणाम!
राम गणेश गडकरी, डी. एस. खटावकर, पं. दिनकर कैकिणी नामवंत लेखक, कवी, नाटककार राम गणेश गडकरी, ख्यातनाम शिल्पकार, चित्रकार, मूर्तिकार दत्तात्रेय श्रीधर खटावकर आणि आग्रा घराण्याचे गायक पं. दिनकर कैकिणी यांचा २३ जानेवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
अशोक समेळ, मिलिंद इंगळे, स्मिता सरवदे-देशपांडे, शेख मुख्तार ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ, प्रसिद्ध संगीतकार व गीतकार मिलिंद इंगळे, प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता सरवदे-देशपांडे यांचा १२ मे हा जन्मदिन. तसेच, बॉलीवूडचे पहिले ‘माचो मॅन’ अभिनेते शेख मुख्तार यांचा १२ मे हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
नंदू भेंडे, जेम्स पार्किन्सन, शुभांगी अत्रे-पुरी मराठीतील पहिले रॉकस्टार नंदू भेंडे यांचा ११ एप्रिल हा स्मृतिदिन. तसेच, पार्किन्सन्स डिसीजचा शोध लावणारे ब्रिटिश डॉक्टर जेम्स पार्किन्सन आणि अभिनेत्री शुभांगी अत्रे-पुरी यांचा ११ एप्रिल हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language